BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

नगरपालिकांच्या मतदानाला सुरुवात

NEXT ARTICLE

मुंबई विमानतळावर दोन कोटींच्या सोन्यासह साडेसात लाखांची रोख रक्कम जप्त

आचारसंहिता काळात २६ कोटींची रोख रक्कम, अवैध मद्य जप्त – सहारिया

Published: 2016-11-27 11:38 AM IST

 

मुंबई,  राज्यात पहिल्या टप्प्यातील १६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ता. २७  मतदान आहे. त्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज असून सदस्य पदांच्या ३ हजार ७०५ व थेट नगराध्यक्ष पदांच्या १४७ जांगासाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, आचारसंहितेच्या काळात २६ कोटी ४ लाख ४७ हजार २५० रुपयांची रोकड आणि १ लाख २४ हजार ३३६ लीटर अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

सहारिया म्हणाले की, आचारसंहितेच्या काळात ९ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली असून ६९ आचारसंहिता भंगांच्या तक्रारी, ३० मालमत्ता विद्रुपीकरण तक्रारी करण्यात आल्या. १६ हजार ८१० संशयित व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून ३ हजार १७३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ८ हजार ७४१ व्यक्तींनी शांततेसाठी जामीनपत्रे घेतली आहेत. या काळात ४ हजार ७१८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.

सहारिया यांनी सांगितले की, जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात २५ जिल्ह्यांमधील १४७ नगरपरिषदा व १८ नगरपंचायतींसाठी (एकूण १६५) उद्या मतदान होणार होते; परंतु शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता १७ नगरपंचायतींसाठी मतदान होईल; तसेच विविध ठिकाणी २८ उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यामुळे सदस्य पदाच्या ३ हजार ७०५ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. त्यासाठी १५ हजार ८२६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगरपरिषदेच्या १४७ थेट नगराध्यक्ष पदांसाठी १ हजार १३ उमेदवारांमध्ये लढत होईल. या सर्व ठिकाणी उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. २८ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरवात होईल. निकालानंतर संबंधित ठिकाणाची आचारसंहिता संपुष्टात येईल.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी पुरेशा बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. गृहरक्षक दलाचे जवानही तैनात असतील. आवश्यकतेनुसार राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत पुरेशी काळजी घेतली जाणार आहे. नगरपरिषदेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होत आहे; तसेच नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांची थेट निवडणूक होत आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला सदस्य पदासाठी दोन ते तीन आणि आणखी एक मत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी द्यायचे आहे. नगरपंचायतींची निवडणूक एक सदस्यीय पद्धतीने होत आहे. तिथे प्रत्येक मतदाराला केवळ एक मत द्यायचे आहे. त्यासाठी अधिकाधिक संख्येने मतदार बंधू- भगिनींनी घराबाहेर पडून निर्भीडपणे मतदान करावे आणि लोकशाही बळकट करावी.

उमेदवार व अन्य तपशील - एकूण प्रभाग - १,९६७, सदस्यपदांच्या जागा - ३,७०५, थेट नगराध्यक्षपदांच्या जागा – १४७, एकूण मतदान केंद्रे - ७,६४१, एकूण मतदार - ५८,४९,१७१, पुरुष मतदार - ३०,२०,६८३, स्त्री मतदार - २८,२८,२६३, इतर मतदार – २२५, सदस्यपदांसाठी उमेदवार - १५,८२६, बिनविरोध विजयी सदस्य – २८, थेट नगराध्यक्ष पदांसाठीचे उमेदवार - १,०१३

STAY IN TOUCH!

LATEST NEWS