BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

उद्योजकाची चार कोटीची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल

NEXT ARTICLE

अर्थमंत्रालयाने रिझर्व्ह बँकेच्या कारभारातील हस्तक्षेप थांबवावा

नोटा रद्द - ३० डिसेंबरपर्यंत सर्व सुरळीत होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे आश्वासन

Published: 2016-12-06 02:41 PM IST

 

मुंबई, केंद्र सरकारने घेतलेल्या नोटा रद्दच्या निर्णयासंदर्भात ३० डिसेंबरपर्यंत सर्व परिस्थिती सुरळीत होणार असल्याचे आश्वासन डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले. नोटा रद्दच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात गव्हर्नर यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले. या शिष्टमंडळात खा. गजानन कीर्तीकर, खा. राहूल शेवाळे, खा. अनिल देसाई आणि खा. अरविंद सावंत यांचा समावेश होता.

नोटा रद्दचा निर्णय घोषित केल्यानंतर २८ दिवस उलटून गेले तरी अद्यापही देशातील परिस्थिती सुधारत नाही. राज्यातील तसेच देशातील जनतेला अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे, याबाबत रिझर्व्ह बँकेने काय पावले उचलली आहेत, अशी विचारणा या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. देशातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे तातडीने पावले उचलण्यात यावी, अशी विनंती या शिष्टमंडळाने केल्याचे समजते.

नोटा रद्दच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. कमी रकमेच्या म्हणजे २०, ५० रुपयांच्या नोटांची छपाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच पाचशेच्या नव्या नोटाही मोठ्या प्रमाणात छापल्या जात आहे. नव्या नोटा देशभरात पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. बँकाच्या शाखेत आणि एटीएम केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्याने मुबलक प्रमाणात नोटा मिळण्यास सुरुवात होईल. केंद्र सरकारने दिलेल्या मुदतीपर्यंत म्हणजेच ३० डिसेंबरपर्यंत सर्व परिस्थिती सुरळीत होईल. याबाबत जनतेने निश्चिंत असावे, असे आश्वासन गांधी यांनी दिल्याचे खा. देसाई यांनी पत्रकारांना सांगितले. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये रोखविहीन व्यवहारांबाबत जागरुकता निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही गांधी यांनी नमूद केल्याचे देसाई यांनी सांगितले.

शिवसेनेने या नोटा रद्दच्या निर्णयाचे स्वागतच केले आहे. देशातील सामान्य जनतेला होत असणाऱ्या त्रासाबाबतची माहिती राष्ट्रपतींपर्यंत पोहोचावी, यासाठी फक्त आम्ही राष्ट्रपती भवनापर्यंत काढलेल्या मोर्चात सहभागी झालो होतो, असे खा. गजानन कीर्तीकर यांनी स्पष्ट केले. ३० डिसेंबरपर्यंत जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर त्यानंतरच्या परिणामांना सरकार जबाबदार असल्याचे कीर्तीकर यांनी सांगितले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS