BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

संजय निरुपम यांचा मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा; पराभवाची जबाबदारी स्वीकारली

NEXT ARTICLE

मुलुंडमधील सर्व सहा जागांवर भाजपचा विजय

मॅन ऑफ द मॅच - देवेंद्र फडणवीस

Published: 2017-02-23 06:09 PM IST

 

मुंबई राज्यातील दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळविले आहे. निवडणुकीच्या या सामन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नि:संशयपणे मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री फड़णवीस यांनी स्वत:ला झोकून देत प्रचार केला होता. विपरित परिस्थिती असूनही फडणवीसांनी एकहाती किल्ला लढवत भाजपला दणदणीत यश मिळवून दिले. नागपूर, आमरावती, अकोला यांसह पुणे, नाशिक, उल्हासनगर, सोलापूर या महापालिकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे.

ही निवडणूक मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप यांच्या दृष्टीने मुळीच सोपी नव्हती. याचे कारण लाकसभा आणि विभानसभेप्रमाणे मोदी लाट मदतीला नव्हती. याशिवाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मुंबईसह सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली होती. शिवसेनेमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी मतांचे विभाजन होण्याची भिती होती.  भाजपने 1992 पासून महापालिका आणि जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणुका शिवसेनेच्या साथीनेच लढविल्या होत्या. अनेक ठिकाणी भाजपचे संघटनात्मक बळ अत्यंत तोकडे होते. तरीही केवळ शहरी भागातच नव्हे तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजपने  दणदणीत कामगिरी केली आहे. नोटा रद्दच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका शेतक-यांना सांगितले जात होते. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपा मोठा धक्का बसणार असा अंदाज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला होता. मात्र,  जिल्हा परिषदांचे निकाल पाहिल्यावर भाजपने ग्रामीण भागतही आपले पाय चांगलेच रोवल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्हा परिषदेसारखी अनेक वर्षे कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा परिषद भाजपने स्वबळावर जिंकली आहे. याखेरीज ठाणे, पिंपरी-चिंचवड यासारख्या संघटनात्मक बळ नसलेल्या शहरांमध्ये  भाजपने चांगली कामगिरी केल्याचे दिसते आहे.

या विजयाचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री फ़डणवीस यांनी आखलेल्या रणनितीला आहे. नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये  फडणवीस यांनी प्रचाराची अत्यंत नियोजनबद्ध आखणी केली होती. त्यामुळे भाजपचे 75 नगराध्यक्ष निवडून येऊ शकले. त्या निवड़णुकीपेक्षाही महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपने अधिक सुसूत्र प्रचार यंत्रणा राबविली. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये अन्य पक्षातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींना प्रवेश देण्यात आला होता. याबद्दल प्रसार माध्यमांनी भाजप विरुद्ध प्रचंड काहुर उठविले होते. याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देण्यात दिरंगाई होत असल्याने या समाजातर्फे भाजपला मतदान न करण्याचे आवाहन सोशल मिडियामार्फत करण्यात येत होते. मित्रपक्षांना कमी जागा दिल्यामुळे या पक्षांनी असहकार पुकारला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी तर नाशिक, पुणे या जिल्ह्यांत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून भाजप नेतृत्वावर कडवट भाषेत टीका करणे चालू केले होते. यातून भाजप विरोधात नकारात्मक संदेश मतदारांपर्यंत जात होता. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पक्षाच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली. सहकारी मंत्र्यांना आपापले मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी सोपवून मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या साथीने राज्यभर प्रचारांचा धडाका लावला होता. प्रचारसभांमध्ये विरोधकांवर वैयक्तिक टीका करण्याऐवजी आपल्या सरकारने केलेली विकासाची कामे सांगण्याकडे फडणवीस यांचा कल होता.

मुंबईत उद्धव ठाकरे यांनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुंबईत शिवसेनेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे संघटन नाही. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर जहरी टीका करण्याचा सपाटा लावला होता. या टिकेला मुख्यमंत्र्यांनी संयम पाळत उत्तर दिले. फारशी संघटनात्मक ताकद नसतानाही मुंबईत भाजपला मिळालेल्या जागा हे मुख्यमंत्र्यांच्या मेहनतीचे आणि रणनीतीचे फळ आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी ग्रामीण भागाकडे तेवढेच लक्ष दिले. त्यामुळे रत्नागिरीसारखा अपवाद वगळता भाजपने सर्व जिल्हा परिषदांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अत्यंत अल्प बळ असलेल्या रायगड जिल्ह्यातही या पक्षाने जिल्हा परिषदेत चंचूप्रवेश केला आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS