BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

हास्य हे मनुष्याला मिळालेले वरदान

NEXT ARTICLE

बालसाहित्यामुळे विचार प्रक्रिया वाढीस लागते : डॉ. सुरेश सावंत

आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आनंदाने सामोरे जायला हवे - आशा भोसले

Published: 2016-11-23 04:46 PM IST

 

पुणे, पंडित राम मराठे यांच्यासारख्या मोठया व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार मिळतोय, याचा मला मनस्वी आनंद होत आहे, राम मराठे यांचे अनेक सिनेमे मी पाहिलेत. एवढया मोठया व्यक्तीच्या नावाच्या पुरस्कारासाठी मी लायक नाही, असे मला वाटते. प्रत्येक माणसाने स्वत:ला नेहमी छोटे समजून हसत राहावे. जो क्षण आयुष्यात येईल त्याला आनंदाने सामोरे जायला हवे, असे मत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले.

पुणे भारत गायन समाजातर्फे देण्यात येणारा पंडित राम मराठे स्मृती पुरस्कार शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. पं. हृदयनाथ मंगेशकर, पुणे गायन समाजाच्या अध्यक्षा शैला दातार आदी यावेळी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र व दोन लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

भोसले म्हणाल्या, पुणेकरांनी जो मान दिला आहे तो माझ्यासाठी खूप मोठा आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून मी अजून उभी आहे. तुमच्या प्रेमावर अनेक आर्टिस्ट उभे राहिले. माझी मराठी गाण्याची सुरुवात पुण्यातच झाली. माझ्या आयुष्यात मला खूप चांगली गाणी गायला मिळाली तसेच अनेक चांगली लोकही मिळाले. मी खरे बोलायचे त्याचा अनेकांना आधी त्रास व्हायचा. आत्ताच्या लोकांना मात्र माझी ही सवय आवडते. आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमांना अनेक मंत्री यायचे. त्यातील एकाला आमच्या कुटुंबाबाबत माहिती नव्हती. त्यांनी माझ्याकडून माहिती घेऊन वडिलांच्या पुण्यतिथी दिनी भाषण केले व भाषणात अनेक खोट्या गोष्टी बोलल्या. त्या वेळी असे वाटले की हे असेच जनतेला खोटी आश्‍वासने देऊन फसवत असणार, असा टोलाही त्यांनी या वेळी राजकारण्यांना लगावला.

पुरंदरे म्हणाले, मी गायचे ठरवले होते, पण मंगेशकर मागे पडतील म्हणून मी गायलो नाही. आशावर खूप लिहायची इच्छा आहे व लवकरच लिहिणार आहे. मोगऱ्याचा वास जसा फूल सोडून जात नाही तशा आठवणी आमच्या आहेत. रसिकांच्या विनंतीवरून आशा भोसले यांनी पं. दीनानाथ मंगेशकर यांचे शूरा मी वंदिले हे गाणे गायले. पुरस्कार सोहळ्यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर व शैला दातार यांच्या गायनाची मैफल झाली.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS