BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आनंदाने सामोरे जायला हवे - आशा भोसले

NEXT ARTICLE

जागतिकीकरणामुळे शेती व्यवसाय उद्ध्वस्त झाला : प्रा. देशमुख

बालसाहित्यामुळे विचार प्रक्रिया वाढीस लागते : डॉ. सुरेश सावंत

Published: 2017-02-04 08:16 PM IST

 

डोंबिवली बालसाहित्यामुळे बालकांना कल्पनेचे पंख मिळतात आणि त्यांची विचार प्रक्रिया वाढीस लागते, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी आज येथे केले. ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘बाल कुमार मेळाव्या’त‘ बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले?’ या विषयावरील परीसंवादात ते बोलत होते. या वेळी परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. न. म. जोशी, एकनाथ आव्हाड, नरेंद्र लांजेवार उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले की, आजचे युग हे विज्ञानयुग आहे. आजची पिढी चिकित्सक आहे. त्यामुळे त्यांना उत्तम बालसाहित्याची गरज आहे. मनोरंजन आणि साहित्य याचा ताळमेळ ठेवून आणि खेळातून विज्ञान सोपे करून सांगता येणारे साहित्य त्यांना मिळाले, तर लोप पावत चाललेली वाचन संस्कृती वाचवता येर्इल.

बालविश्व आणि बालसाहित्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बालसाहित्याला विविध पैलू असतात. पण बालसाहित्य म्हणावे तितके चर्चीले जात नाही, ते उपेक्षित राहते, अशी खंतही सावंत यांनी यावेळी बोलून दाखवली .

या परिसंवादात बोलताना डॉ. न. म. जोशी म्हणाले की, मुलांची कल्पानाशक्ती विलक्षण असते, पण त्याला वळण लावले पाहिजे. बालसाहित्यात दोन प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे मुलांना जे वाचायला आवडत असते, ते त्यांना द्या. पण त्याचबरोबर न आवडणारे बालसाहित्यदेखील त्यांना वाचायला शिकवा.

याच विषयावर बोलताना एकनाथ आव्हाड म्हणाले, मुलांचे आताचे जग काय आहे, हे समजून बालसाहित्य लिहिले पाहिजे. मुलांना सध्या नाविन्याची गरज आहे. बालमनाचे गुणधर्म असलेले साहित्य टिकते. त्यामुळे मुलांना गृहित धरून लेखन करून नका, तर त्यांचा लेखनावर विश्वास वाढेल, असे लिखाण करा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

या परिसंवादात नरेंद्र लांजेवार यांनीही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘गुगल’ नावाची देवता हल्ली बालवाचकांवर प्रसन्न झाली आहे. त्यामुळे जिज्ञासा संपुष्टात आली आहे. पूर्वी काही जाणून घ्यायचे असेल, तर वाचन करावे लागत होते. पण आता गुगलमुळे जिज्ञासा काही प्रमाणात संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता पालकांनीच बालसाहित्य मासिकांची वर्गणी भरून पाल्याला चांगले साहित्य वाचायला शिकवायला हवे, असा उपदेश लांजेवार यांनी आजच्या पिढीतील पालकांना केला.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS