BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

नाशिक जिल्ह्यातून ७८४ टन द्राक्ष निर्यात

NEXT ARTICLE

माजी जिल्हा परिषद सदस्यांचा आत्महत्त्येचा प्रयत्न

औरंगाबादला स्मार्टबरोबरच सुरक्षित शहर करू - मुख्यमंत्री

Published: 2017-03-03 07:33 PM IST

 

औरंगाबाद, २ मार्च   : औरंगाबाद शहराला स्मार्ट सिटी बनवितानाच हे शहर अधिकधिक सुरक्षित बनविण्यासाठी योजना करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिली. येथील पोलिस मुख्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचा आणि अधिकारी व पोलिसांच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन करताना झालेल्या समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष  हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व रणजीत पाटील, महापौर बापू घडामोडे आदी उपस्थित होते.

पोलिस आयुक्तालय आणि ५३२ घरांच्या इमारतीचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, औरंगाबाद शहर हे स्मार्ट सिटी करत असताना ते सुरक्षित शहर करण्याचा विचार करणार आहोत. त्यासाठी औरंगाबाद शहरात जास्तीत जास्त ठिकाणी सीसी टीव्ही कँमेरे बसविले जातील. या कँमेऱ्यांचे नियंत्रण पोलिस आयुक्तालयात राहील. त्याची योजना नव्या इमारतीमध्ये करण्यात येईल. देशात गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना शिक्षा होण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण ९ टक्क्यांपर्यंत घसरले होते. त्यामध्ये आपल्या सरकारच्या काळात प्रचंड सुधारणा झाली असून आता हा दर ४० ते ४२ टक्क्यांवर गेला आहे. देशात याबाबतीत महाराष्ट्र पोलिसांचा आता पहिल्या पाच क्रमांकात नंबर लागतो यात आणखी सुधारणा घडवून महाराष्ट्र पोलिसांना पहिल्या क्रमांकावर घेवून जावू असे ते म्हणाले.

पोलिसांचे जीवनमान सुधारण्याचा विचार सरकारने केला असून पोलिसांची केवळ क्वार्टर्स उभारून चालणार नाही तर नव्या शहर रचनेत पोलिसांसाठी सर्व सुविधा असलेली टाऊनशिप उभी करण्याचा सरकारचा विचार आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, पोलिसांच्या क्वार्टर्समध्ये व्यायामशाळा, महिला आणि मुलांसाठी कौशल्य विकासाची केंद्रे उभी करण्याचा विचार आहे. क्रिडा क्षेत्रात केवळ स्पर्धा भरवण्यावर न थांबता चांगले खेळाडू विकसित करण्यासाठी योजना केली जाईल. निवृत्त पोलिसांना स्वत:ची मालकीची घरे बनविण्यासाठी जागा देणे, स्वस्तात घर बांधण्याची योजना याबाबतही योजना करण्याचा शासनाचा विचार असल्याचे ते म्हणाले. निवृत्त पोलिसांच्या आरोग्यासाठी म. फुले जनआरोग्य योजनेतून तपासणी व उपचार याबाबत योजना करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.  यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचेही भाषण झाले. आयुक्त अमितेशकुमार यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमास पोलिस महासंचालक सतीश माथूर, गृहनिर्माण विषयातील पोलिस महासंचालक व्ही. डी. मिश्रा हेही उपस्थित होते.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS