BREAKING NEWS

< >

recipes for kids

 

आपल्या मुलाला पौष्टिक आणि चवदार पदार्थ खायला घालावेत असं प्रत्येक आईला वाटत असतं. शाळेत दिलेला डबा रिकामा होऊन घरी आला तर ती धन्य होते. त्यामुळे दरवेळेस टिफिनमध्ये त्याला चांगले पदार्थ देण्याचा ती प्रयत्न करते. ते पदार्थ चटपटीत तर असावेतच शिवाय पौष्टिकही असावेत असा तिचा आग्रह असतो. टिफिनसाठीचे हे काही पदार्थ :

उकडलेले काळे वाटाणे, उकडलेल्या बटाट्याचे थोडे चौकोनी तुकडे, टोमॅटोच्या चकत्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा लिंबाचा रस आणि चाट मसाला. हे सगळे पदार्थ एकत्र करून त्याची छान चाट बनवावी. ब्रेकफास्टसाठीही हा उत्तम पदार्थ आहे. यात भरपूर प्रोटीन्स आणि काबोर्हायड्रेट्स असतात.
 
पराठा बनवताना त्यात वेगवेगळी पीठं वापरावीत. म्हणजे थोडं गव्हाचं, थोडं चण्याचं, ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ पराठ्यात वापरावं. हे पराठे आणखी पौष्टिक बनवण्यासाठी त्यात थोडी बारीक चिरलेली मेथी, चवीनुसार मीठ आणि दही पीठ मळतानाच घालावं. पराठ्याचा आकार लहानच ठेवावा.

खूप घाई झाली असेल तर सॉल्टी बिस्किट्सवर चीझचे तुकडे ठेऊन ते टिफिनमध्ये द्यावं.

डब्यात सॅण्डविच द्यायचं असेल तर ब्रेडच्या कडा कापू नका. या सॅण्डविचमध्ये उकडलेले बटाटे, किसलेलं गाजर, काकडी आणि थोडं दही हे पदार्थ वापरावेत. चवीनुसार मीठ आणि काळी मिरीपूड घालावी.
 
पोहे हासुद्धा डब्यात देण्यासाठीचा चांगला पदार्थ आहे. त्यात कधीकधी गाजर, मटारही घालावेत. अशाने पोहे अधिक पौष्टिक तर बनतीलच शिवाय ते आकर्षकही दिसतील.

इडलीमध्ये तर बरेच प्रयोग करता येतात. इडलीच्या तयार मिश्रणात मटार, गाजर, काजू, चणाडाळ घालावी. अशा मिक्स इडल्या खूप चवदार लागतात. त्या अधिक आकर्षक दिसाव्यात म्हणून त्यांना भाज्यांचा वापर करून डोळे आणि नाकही काढावं. मुलं जेव्हा डबा उघडतील तेव्हा या हसऱ्या इडल्या पाहून ते चकितच होतील.

मोड आलेल्या मुगाचं सॅलडही त्यांना डब्यात द्यावं. या सॅलडमध्ये मूग, टोमॅटो, काकडी, बीट आणि डाळिंबाचे थोडे दाणे घालावेत. या सॅलडला मी ‘बॉक्स ऑफ ज्वेल’ म्हणतो.
 
घरच्या घरी पौष्टिक फ्रँकीही बनवता येईल. चपातीच्या मधोमध एखादी सुकी भाजी घ्यावी. त्यावर थोडा चाट मसाला भुरभुरावा आणि त्याची सुरळी करावी. तव्यावर ती थोडी गरम करावी. थंड झाल्यावर डब्यात भरावी.

दररोज डब्यात पोळी-भाजी पाहून मुलं कंटाळणारच. त्यामुळ बऱ्याचदा त्यांचा जेवणाचा डबा तसाच घरी येतो. तेव्हा आईने थोडीशी कल्पकता वापरली आणि प्रयोग करण्याची तयारी ठेवली तर मुलं आनंदाने डबा खातील.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS